बुलडाणा, दि. 21 : सांस्कृतिक परंपरांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिखली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाला ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाने सुरुवात झाली. आमदार श्वेता महाले यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, तहसिलदार माया माने आदी उपस्थित होते.
सुरवातीला शाहिर डी. आर. इंगळे यांच्या समूहाने पोवाडा सादर केला. तालुका क्रीडा संकुलात दि. २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सव घेण्यात येत आहे. या महोत्सवास आज, दि. 20 फेब्रुवारी रोजी सुरुवात करण्यात आली.
ऋषिकेश रानडे यांनी गणपती बाप्पा मोरया, कानडा राजा पंढरीचा, लव कुश रामायण गाती, पूत्र मानवाचा आणि विठ्ठल नामाचा रे टाहो अशी भक्तीगीत सादर केली. आनंदी जोशी यांनी फुलले रे क्षण माझे, का रे दुरावा ही गाणी सादर केली. ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांनी चंद्र आहे साक्षीला, फिटे अंधाराचे जाळे आदी सुरेल गीते सादर केली.
कार्यक्रमस्थळी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हस्तकला आणि पारंपरिक वस्त्रांचे दालन आणि पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहे. सुरवातीला या दालनाला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार माया माने यांनी भेट दिली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी हे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची मराठी, हिंदी गाणी सादर केले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव या लोककला सादर करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील नामांकीत कवींचे कवी, हास्यकवी संमेलन होईल. त्यानंतर दीप्ती आहेर आणि समूह पारंपरिक लावणी सादर करतील.
तसेच गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार अनिरुद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करतील. तसेच गौरी थोरात ह्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करतील.
महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी विनामूल्य प्रवेश आहे. नागरिकांनी सांस्कृतिक आणि लोककलांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा